कृषि
कृषि
हा शब्द ‘कृष्’ म्हणजे ‘नांगरणे’ या धातूपासून झाला आहे. परंतु ‘कृषि’ या संज्ञेचा अर्थ केवळ जमीन नांगरून तीत पीक काढणे एवढ्यापुरताच मर्यादित नाही. कृषिव्यवसायाचा व्याप बराच विस्तृत आहे. आपल्या अन्न, वस्त्रादी गरजा भागविणारे पदार्थ आपणास वनस्पती व प्राणी यांच्यापासून मिळतात. म्हणून पिके काढण्याबरोबरच गुरे, बकऱ्या, मेंढ्या, कोंबड्या व मधमाशा पाळणे रेशमाचे किडे पोसणे बागाईत करून फळफळावळ काढणे वगैरे उद्योगांचाही कृषीमध्ये समावेश होतो. थोडक्यात मनुष्यबळ, प्राणी, अवजारे व यंत्रे यांच्या साहाय्याने जमीन कसून पिके काढणे, ह्याला ‘कृषिकर्म’ किंवा शेती म्हणतात पण त्यात पशुपालन, कुक्कुटपालन यांसारखे व्यवसायसुद्धा अंतर्भूत आहेत. शेतीचे दोन प्रकार आहेत : जिराइती (फक्त पावसावर अवलंबित) व बागाइती (सिंचाईवर अवलंबित). शेतीत जी पिके काढतात, त्यांचे दोन मुख्य पेरणीचे हंगाम आहेत :
खरीप व रब्बी.
पावसाळ्याच्या सुरुवातीस पेरणी करून येणारी जी पिके ती खरीप पिके व हिवाळ्यात पेरणी करून काढलेली ती रब्बी हंगामाची पिके होत. बागाइतीत विहिरीच्या किंवा पाटाच्या पाण्यावर भाजीपाला, फुलझाडे व फळफळावळ इत्यादींचे उत्पादन करण्यात येते.
भारतातील शेतीचा इतिहास
नव-अश्मयुगाचा काळ इ.सु.पू. १०,००० वर्षांचा गणला जातो. तत्पूर्वी मानव रानटी अवस्थेत होता. शेतीला नव-अश्मयुगात सुरुवात झाली असे मानतात. तत्कालीन लोक गाई, बैल, घोडे वगैरे जनावरे पाळीत. यानंतरच्या म्हणजे ताम्रपाषाण युगाच्या काळात (इ. स. पू. ५००० ते ३०००) लोक शेती करून घरे बांधून स्थायिक झाले.
त्या काळी शेती बरीच प्रगत झाली होती. हे लोक ईजिप्त, इराण, मेसोपोटेमिया वगैरे देशांशी व्यापार करीत.
मोहें-जो-दडो आणि हडप्पा येथील उत्खननांवरून सिंधू संस्कृती (इ. स. पू. ३२००–२७००) ही नागरी संस्कृती होती, हे स्पष्ट दिसते. त्या संस्कृतीतील लोकांचा व्यवसाय मुख्यतः शेती असून कापूस, जव, टरबुजे, खजूर, भाजीपाला व फळे यांची ते लागवड करीत असावेत, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. गहू, जव, विविध शेंगा, तीळ यांचीही पिके त्याकाळी काढली जात असावीत. भातशेतीचा पुरावा मिळत नाही. कापसाची निर्यात मेसोपोटे मियासारख्या देशांत केली जाई. कृत्रिम जलसिंचनाबद्दल खात्री देता येत नाही पण त्याच्या अस्तित्वाची शक्यता आहे. आता परिचित असलेले बहुतेक भारतीय प्राणी– गाई, बैल, म्हशी, शेळ्यामेंढ्या, डुकरे, कोंबड्या– तेव्हाही पाळले जात. घोड्याच्या अस्तित्वाबद्दल साशंकता आहे. हडप्पामध्ये सापडलेल्या एका मोठ्या धान्य कोठारावरून शेतकऱ्यांकडून कर वसूल केला जात असावा, असे अनुमान निघते.
Comments
Post a Comment